परिचय

||श्री नारदो विजयते||
समस्त जगभर उपलब्ध असलेल्या माहिती महाजालाच्या या संकेत स्थळावर ” नारदीय कीर्तन परंपरा.” आणि ” अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या ” माहिती दालनात आपले हार्दिक स्वागत !
. . . “श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ! “
. . . “अर्चनं वन्दनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् . !! “ ( नवविधा भक्ति ) 
” कीर्तन ” शब्दाचा उगम संस्कृत ” कीर्त ” (१० आ.) धातूपासून झाला आहे. प्रशंसा, गुणवर्णन , पराक्रम , लीलाचरित्र , स्तुतिपाठ करणे . अर्थात थोडक्यात सांगायचे तर परमेश्वराच्या चरित्राचे कथाकथन, दैवी गुणांचे आणि विभूतींच्या पराक्रमाचे कीर्तीगान किंवा कथाकथन म्हणजेच कीर्तन होय.
हरिकीर्तनाची परंपरा सर्व भारतात फार प्राचीन काळापासून आहे. गावा-गावातून पुराण, प्रवचन आणि कीर्तनाचे आयोजन फार पूर्वीपासून केले जाते. टाळ मृदुंगाच्या साथीत हरीनामा बरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून कीर्तन सर्वाना माहित आहेच. कीर्तनात नारदीय, वारकरी, रामदासी आणि राष्ट्रीय कीर्तन असे ठळक भेद मानले जात असले तरी कीर्तन हे मुळात ” अध्यात्म मार्गाचे एक साधन ” म्हणून आणि ” नवविधा भक्तीचा एक प्रकार ” म्हणून सर्वश्रुत आहे. पुराणातील आदर्श हरीभक्त आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले देवर्षी नारद हेच कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जातात, इतकी ही कीर्तनाची जुनी पद्धती आहे. भारतात सर्व राज्यात कीर्तन परंपरा थोडयाफार फरकाने आहेच.महाराष्ट्रात कीर्तन, गुजरातेत संकीर्तन, उत्तरेत हरिकीर्तन , दक्षिणेत हरिकथा , आंध्रात कथाकली, तर पंजाबात गुरुद्वारात होणारे शबद-कीर्तन म्हणून कीर्तनच सादर होत असते. कथानके मुख्यतः पुराणे, रामायण, महाभारतावर व देशातील संत परंपरा आणि इतिहास यावर आधरित असतात.
नारदीय कीर्तनाचे नियमित प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून घेणाऱ्या पाठशाला आज दादर (मुंबई) तसेच पुणे व नागपूर येथेही आहेत. नारदीय कीर्तन परंपरेचा आणि मुंबईतील कीर्तन संस्थेचा परिचय आपणास येथे करून देत आहोत.
कीर्तन परंपरेचे मुख्य २ प्रवाह आहेत.

१) नारदीय कीर्तन म्हणजे देवर्षी नारदांनी सुरु केलेला संगीत,अभिनय व नृत्यमय प्रकार होय.हे पुरातन/आद्य कीर्तन होय.(नारदांची गादी)

२) वैयासिक म्हणजे व्यास महर्षींचे सुपुत्र "शुकमुनी" यांनी प्रवर्तित केलेला गद्यप्रधान निरुपण प्रकार अर्थात ” प्रवचन किंवा पुराण कथन. ”(व्यासपीठ)

सर्वसाधारणपणे नारदीय कीर्तन हा भक्तीचा अविष्कार मुख्यतः एकच कीर्तनकार हा झांज, चिपळी , मृदंग किंवा तबला,संवादिनी अशा संगीत साथीदारासह करीत असतो. क्वचित बासरी व्हायलीन सतार अशी वाद्येही साथीला असतात. पूर्वरंग आणि आख्यान असे दोन मुख्य भाग मिळून नारदीय कीर्तन सादर केले जाते. चातुर्मास , सणसमारंभ , जन्मोत्सव विविध धार्मिक महोत्सव अश्या प्रसंगी कीर्तनकार बोलावून कीर्तन आयोजित करतात. काही देवळात वर्षभर प्रवचन आणि कीर्तनाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. प्रवचन किंवा पुराण हे ग्रंथावर आधारीत गद्य निरुपण असते. कीर्तनात निरुपणाला संगीताची जोड असते.तरीही कीर्तन ही मुळात उपासना किंवा भक्तीच आहे. ती कला किंवा मनोरंजनात्मक कलाप्रकार नाही.
नारदीय कीर्तनात खालील ठळक ५ भाग असतात.
१) नमन. म्हणजे देवतांना आवाहन आणि प्रार्थना .
२) पूर्वरंग. अध्यात्म विषयावर केलेले अभ्यासपूर्ण निरुपण.
३) नामजप . ( एक अविभाज्य भाग म्हणून हे ” नाम संकीर्तन ” कीर्तनात हवेच.
४) उत्तररंग . म्हणजे आख्यान किंवा कथा . यावरूनच कीर्तनकाराला ” कथेकरी बुवा ” म्हणण्याची पद्धत पडली.
५) आरती. (आर्ततेने केलेली परमेश्वराची आळवणी )
संत साहित्य , संस्कृत – मराठी सुभाषिते, नामवंत कवींच्या अर्थपूर्ण कविता, अध्यात्मिक विषयावर निरुपण, किंचित दर्जेदार विनोद आणि भारतीय शास्त्रीय-सुगम संगीत गायन, काही वेळा नर्तन आणि विषय विवरण यांनी सजविलेला एकपात्री भक्तीचा अविष्कार म्हणजे नारदीय कीर्तन . इंग्रजी हिंदी आणि उर्दू काव्यातील उधृते, शेर, गझल सुद्धा विषयाचे विवरण करण्यासाठी योग्य संदर्भात वापरात येतात . असे नारदीय कीर्तन हे बहुरंगी आणि सर्व-समावेशक आहे. विविध चालीची पदे, श्लोक, आर्या, दिंडी साकी, ओवी, याशिवाय पोवाडा, फटका, कटाव, आणि मराठी काव्य प्रकारातील इतर अनेक दुर्मिळ वृत्ते कीर्तनात गायली जातात . इतकेच नव्हे तर या कीर्तनातूनच ” मराठी संगीत नाटक मंडळीनी आणि जुन्या चित्रपटांनी अनेक सुमधुर लोकप्रिय चाली स्विकारल्या.
वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरुपण अश्या पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते.वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जन-सामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरु केली. वारकरी कीर्तन आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते.
रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरु केली. रामदासी कीर्तन हे समर्थांच्या रचनांवर मुख्यतः आधारीत असते. आख्याने सुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात. श्रीधरस्वामी, केशवस्वामी , रंगनाथ स्वामी अश्या रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते.नारदीय कीर्तनातील आधुनिक प्रकार म्हणजे
१) संयुक्त कीर्तन
२) जुगलबंदी कीर्तन आणि
३) राष्ट्रीय कीर्तन.
पहिला प्रकार म्हणजे दोघे कीर्तनकार एकाच वेळी मंचावर सादर करीत असतात. जुगलबंदीत दोन कीर्तनकार विषयाच्या दोन परस्पर विरोधी बाजू आपापल्या परीने शास्त्राचे दाखले देत मांडीत असतात.आणि अंतीम भागात त्यातले सार किंवा तात्पर्य श्रोत्यांना उलगडून दाखवीत असतात. राष्ट्रीय कीर्तनाची नवी लहर मुख्यत्वे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनापासूनच अवतरली. लो. टिळकांपासून प्रेरणा घेउन डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन यांनी “राष्ट्रीय कीर्तन ” हा नवा प्रकार सादर करून लोकप्रियही करून दाखविला आणि समाजात जागृतीचे नवे दालन उघडून दिले. राष्ट्रीय कीर्तनात मुख्यत्वे राष्ट्रपुरुष , स्वातंत्र्यवीर, संशोधक किंवा क्रांतिकारक आणि समाजसुधारक यांच्या कथा असतात. देशाचे स्वातंत्र्य, जन-कल्याण, आरोग्य , सामाजिक सुधारणा असे समाज शिक्षणाचे विषय प्रामुख्याने प्रबोधनासाठी घेतले जातात. बाकी सर्व बाज नारदीय कीर्तनाचाच असतो. सुप्रसिद्ध थोर क्रांतिकारक स्व. चापेकर बंधू हे पिढीजात कीर्तनकाराच्या कुळात जन्मले होते हे अनेकांना ठाउक असेलच.
वर उल्लेख केल्याप्रमाणे नारदीय कीर्तन परंपरेचे कीर्तनकार तयार करण्यासाठी सुयोग्य असे प्रशिक्षण देणाऱ्या नामवंत संस्था मोजक्याच आहेत. त्यातील एक अग्रगण्य सुपरिचित नाव म्हणजे आमची ” अखिल भारतीय कीर्तन संस्था. ” दादर (प) मुंबई येथे शिवाजी उद्यानाजवळ गेली ७३ वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेचा थोडक्यात परिचय आपणास येथें होईल, आणि नारदीय कीर्तन परंपरेची आणि संस्थेची अधिक ओळख या भेटीने शक्य होईल असा विश्वास आहे.
आपण आता इतर दालनांना अवश्य भेट द्यावी . आणि संस्थेच्या कार्याची अधिक माहिती करून घ्यावी अशी प्रार्थना करून परिचय आवरता घेतो.